जळगाव प्रतिनिधी – ‘माझा भारत सर्वधर्म समभाव मानणारा विविधतेने नटलेला, संस्कृतीचा परिपूर्ण देश आहे. खुदाई खिदमदगार किंवा महाराष्ट्र गो विज्ञान समिती या संस्था संस्कृती टिकविण्याचे काम करत आहेत हा एक चांगला संकेत आहे. गो माता रस्त्यावर पॉलिथिन पिशव्या खातात, गायींची दुरवस्था झालेली दिसते. गाईच्या जमिनीवर मानवाने अतिक्रमण केले आहे गो मातेला तिची जमीन देऊन तिला पूर्ववैभव प्राप्त करून देऊ या…’ असे आवाहन हरिद्वार येथील ज्येष्ठ संत स्वामी सुशिलानंदजी यांनी केले.
जमनाबेन लोकसेवक पुरस्कार (25 वा) प्रदान सोहळा उत्साहात पार पडला त्यात ते बोलत होते. मालेगाव येथील महाराष्ट्र गो विज्ञान समितीच्यावतीने दिला जाणारा हा पुरस्कार जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, गांधीतीर्थने पुरस्कृत केलेला आहे. खुदाई खिदमदगारचे फैसल खान, किरपालसिंह मंडलोई यांना हरिद्वार येथील ज्येष्ठ संत स्वामी सुशिलानंदजी यांच्या हस्ते व साम्ययोग साधनाचे संपादक रमेश दाणे अध्यक्षतेखाली आणि डॉ. सुगन बरंठ यांच्या उपस्थितीत पार पडला. जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन पुरस्कृत 51 हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी पुरस्कारार्थी यांच्या कार्य परिचयाची डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली.
साधना का पथ कठीण है, शपथ लेना तो सरल है… हे गीत गायन आणि प्रास्ताविक डॉ. सुगन बरंठ यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश दाणे यांनी ही आपले विचार व्यक्त केले. ‘गाय हे कृषी अर्थव्यवस्थेचे प्रतीक मानले जाते, गाय हद्दपार किंवा नष्ट झाली तर या देशाचे भवितव्य धोक्यात येईल. गाय वाचविणे हे अत्यंत आवश्यक ठरेल असे मौलिक विचार त्यांनी व्यक्त केले.
‘जमनाबेन लोकसेवक पुरस्कार’ हा सर्वोदयी कार्यकर्त्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मनाला जातो. पुरस्काराचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून सरहद्द गांधी म्हणून ख्याती असलेल्या खान अब्दुल गफार खान यांनी स्थापन केलेल्या खुदाई खिदमतगार चळवळीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या फैसल खान आणि किरपालसिंह मंडलोई यांना 2018 चा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला.
पुरस्कारार्थी फैसल खान यांनी मनोगत व्यक्त केलं. ‘करुणा, मानवता, सहृदयता मानवामध्ये कमी झाले आहे. खुदाई खिदमदगार ही आमची संस्था गांधीजींच्या अहिंसा, करुणा, मानवता आणि सहृदयता मानवामध्ये उतरविण्याचा प्रयत्न करीत आहे. या देशातील प्रत्येक माणूस सुखी बनला तर हा भारत खऱ्या अर्थाने महान बनेल.’ किरपालसिंह यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी खुदाई खिदमदगार कार्याची माहिती दिली. डॉ साजिद अहमद आणि कमलाकर देसले यांनी उर्दूत अनुवादित केलेल्या गीताईची प्रत भेट दिली. डॉ साजिद अहमद यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अपश्चिम बरंठ यांनी तर आभारप्रदर्शन वैद्य विजय कळमकर यांनी केले. कमलाकर देसले यांच्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.