जळगाव (प्रतिनिधी) – जगभरात `जागतिक रंगभूमी दिन’ साजरा व्हावा यासाठी इंटरनॅशनल थिएटर इन्टिटय़ूटने १९६१ सालापासून मोठे प्रयत्न सुरू केले आणि त्यानंतर जागतिक रंगभूमी दिन १९६२ पासून २७ मार्च रोजी जगभरात साजरा होऊ लागला.
कलेचा सामुदायिक आविष्कार अभिव्यक्त होण्याची पद्धत पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर आजतागायत बदलत गेली आहे. व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर’ हा शब्द आणि मराठीत आपण रंगभूमी हा समानार्थी शब्द त्याला वापरतो. एकंदरीतच रंगभूमीच्या उत्कर्षाकरिता झटणाऱ्या कलावंत, तंत्रज्ञ आणि रसिक प्रेक्षकांचा २७ मार्च हा जागतिक रंगभूमी दिवस एक उत्सव आहे.
बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक रंगभूमीदिवस शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात रंगभूमी पूजन करून साजरा करण्यात आला. यावेळी बालरंगभूमी परिषदेची येत्या ३ महिन्यांतील उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, उपाध्यक्ष हनुमान सुरवसे, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, सचिव – अमोल ठाकूर, सहसचिव – आकाश बाविस्कर, कोषाध्यक्ष – सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य सुदर्शन पाटील, नेहा पवार, तसेच रंगकर्मी राहुल पवार, गौरव लवंगाळे आदी उपस्थित होते.