जळगाव – लहान मुलांतील सुप्त कलागुणांचा विकास होऊन त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या १८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात संपन्न झाले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, अरुंधती अभिषेक पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे व स्पर्धेचे परीक्षक गोविंदा गोडबोले (सांगली), नवीनी कुलकर्णी (मुंबई), सुषमा मोरे (नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
नटराज पूजनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक करताना स्पर्धेचे समन्वयक दिपक पाटील यांनी सांगितले की, बालरंगभूमीचा विचार अधिक गांभीर्याने घेऊन भविष्यात तरी बालरंगभूमी समृद्ध करायची असेल, तर पालकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देताना त्यांच्या शारीरिक आरोग्याकडे जसं लक्ष देतो, तसं त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी बालरंगभूमी ही गरज आहे. मुलांचा केवळ आय.क्यू. न वाढवता इ.क्यू. (इमोशनल कोशंट) वाढवणेदेखील गरजेचे आहे, हे ओळखणे आवश्यक आहे. नाटक सादर करणं हा तर व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहेच. पण चांगली बालनाट्यं पाहून एक सुजाण प्रेक्षक घडवणं ही काळाची गरज आहे. टीव्ही, कम्प्युटरला चिकटलेली, कार्टुनच्या मोहपाशात अडकलेली मुलं भविष्यात समाजाला धोकादायक बनू शकतात. कार्टुनच्या अतिरेकाचे दुष्परिणाम परदेशात मनोविकारतज्ज्ञांना चिंताजनक वाटू लागले आहेत.
आज महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सात संघांनी आपले सादरीकरण केले. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगावचे अमोल संगीता लिखीत दिपक महाजन दिग्दर्शित सहल, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे रमेश पवार लिखीत संदीप घोरपडे दिग्दर्शित माझ्या मामाचं पत्र हरवलं, भारती शिक्षण संस्था जळगाव यांचे विभावरी मोराणकर लिखीत सुनिता पाटील दिग्दर्शित भूत, हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट दोंडाईचा यांचे विश्वंभर पुरी लिखीत मनोज ठाकूर दिग्दर्शित निर्बुध्द राजाची नगरी, लोकमंगल कलाविष्कार धुळे यांचे प्रकाश पारखी लिखीत सुजय भालेराव दिग्दर्शित एप्रिल फुल, बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरसोली यांचे प्रांजल पंडीत लिखीत विनय अहिरे दिग्दर्शित कॉपीबहाद्दर, महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ यांचे अमोल संगीता लिखीत अलका भटकर दिग्दर्शित गुणांच्या सावल्या ही बालनाट्ये सादर झालीत. आज (दि.२३) रोजी सकाळी १०.३० वाजेपासून सात बालनाट्यांचे सादरीकरण होणार आहे.