जळगाव – खान्देशातील विविध कोविड रुग्णालयांकडे ८ कोटी ३७ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. महावितरणने वारंवार पाठपुरावा करूनही या रुग्णालयांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे आता नाईलाजास्तव या रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे महावितरणने म्हटले आहे.
कोविडच्या संकटातही महावितरणने नागरिकांसह सर्व रुग्णालये व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा केला. यात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. तेथे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने पूर्णपणे काळजी घेतली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित न करता थकबाकी भरण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे महावितरण वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र रुग्णालयांनी बिलांची थकबाकी भरलेली नाही.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील दोन वीजजोडण्यांची १ कोटी ८४ लाख ६४ हजार २४४ रुपये थकबाकी आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे १० लाख ६९ हजार ११३ रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर गोदावरी फाउंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे तब्बल ५ कोटी २२ लाख ७९ हजार ६३४ रुपयांचे वीजबिल थकीत आहे.
धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे ५३ लाख २९ हजार ९८९ रुपये तर शिरपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे १५ लाख ४९ हजार ७९५ रुपये वीजबिल थकले आहे.
नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ५१ लाख ३ हजार १४२ रुपये वीजबिल थकीत आहे.
याबाबत दोन महिन्यांपूर्वी महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी या रुग्णालयांच्या अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून वीजबिलाची पूर्ण थकबाकी भरण्याचे आवाहन केले होते. थकबाकी भरण्यासंदर्भात वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही संबंधितांकडून कोणताही योग्य प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. कोविड-१९ आपत्तीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असून, थकबाकी वसूल करण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवणे शक्य नसल्याने आपल्या स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून थकबाकी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा कंपनी नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला होता. या पत्रांच्या प्रती जळगाव, धुळे व नंदुरबारचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनाही पाठवण्यात आल्या होत्या.
तथापि, महावितरणच्या आवाहनाला संबंधितांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे थकबाकीपोटी या रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.