चाळीसगाव । शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील मे. राजकुमारा माणिकचंद अग्रवाल या विक्रेत्याकडील लाखो रूपयांचा भेसळयुक्त सोयाबीन तेलाचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे.
तेलात भेसळीचा संशय येताच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी विक्रेत्याकडील ३ लाख ९३ हजार रूपयांचा सोयाबीन तेलाचा साठा साठा जप्त केला. याच्याअंतर्गत विवेक पाटील, नमुना सहाय्यक चंद्रकांत सोनवणे यांच्या पथकाने १५ लिटरचे ४९ कॅन्स, प्रत्येकी १८० किलो वजनाचे १६ बॅरल असा सुमारे ४ लाख किमतीचा तेलसाठा जप्त केला. तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे.
भेसळीचा संशय आल्यास तक्रार करा- विवेक पाटील
नागरिकांनी शिळी, स्वस्त दरातील, रंगीत व हलक्या दर्जाची मिठाई घेणे टाळावे. खवा व इतर अन्नपदार्थ, पॅकबंद पदार्थ घेताना त्याचा समूह क्रमांक व उत्पादन तारीख तपासून घ्यावी. खरेदीनंतर बिल घ्यावे. भेसळीबाबत संशय आल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे संपर्क साधावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी केले आहे.