मुंबई : दिवाळीनंतर म्हणजे १६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये आणि शिक्षण संस्था प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हिरवा कंदील दाखविल्यानंतर आता २३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
राज्याचे जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येत असल्याने माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे, यातही प्राधान्याने दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्याचा विचार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. शाळा बंद असल्या तरी शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी सूचना पाठविल्या असून मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर शाळा सुरू करण्यात येतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. शालान्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकासंदर्भात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षा मंडळातर्फे परीक्षा जाहीर करण्यात येतील.
दिवाळीची सुट्टी आता १४ दिवस मिळणार
दिवाळीच्या सुट्टीत पाचन दिवसांवरून वाढ करून शालेय शिक्षण विभागाने ती १४ दिवसांची केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाला १४ दिवसांचा ब्रेक मिळेल. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या या निर्णयाचे शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी स्वागत केले.