जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी“ या उपक्रमा अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील नियोजन भवनात झाली.आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांनी स्वतः तक्रारींची सुनावणी घेतली.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करत आहे.महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी “महिला आयोग आपल्या दारी“ हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या जनसुनावणीवेळी जिल्हाधिकारी अभीजित राऊत, पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे, सदस्या उत्कर्षा रुपवते,दीपिका चव्हाण,जि.प.चे सीईओ पंकज आशिया,प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा व्हावा या सद्हेतूने महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत ही सुनावणी घेण्यात आली.दरम्यान नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात आली.त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोगाद्वारे करण्यात आले.या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी सहभाग घेऊन आपल्या तक्रारी मांडल्या.