अरुणाचल प्रदेश, वृत्तसंस्था । अरुणाचल प्रदेशच्या कामेंग सेक्टरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अतिउंचीवर असलेल्या हिमस्खलनात भारतीय लष्कराचे 7 जवान अडकले गेल्याचं वृत्त आहे. हिमस्खलनाची एक मोठी घटना घडली आहे. हिमस्खलनाचा तडाखा बसलेल्या लष्कराच्या गस्ती दलाला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचं भारतीय लष्करानं सांगितलं आहे.
बचाव कार्यात मदत करण्यासाठी विशेष पथके विमानातून पाठवण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्यानं वातावरणात बिघाड झाला आहे. हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, मनाली-लेह महामार्गावर हिमस्खलन झाल्याची बातमी आहे. यानंतर सुट्टीवर गेलेल्या पर्यटकांना विशेषतः सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील चार राष्ट्रीय महामार्गांसह 731 हून अधिक रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावर साचलेल्या बर्फामुळे सर्वत्र गाड्या अडकल्या आहेत. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याचे वृत्त आहे. वीज आणि पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. आणखी एक-दोन दिवस अशीच स्थिती राहील – आयएमडी हिमाचल प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, राज्यातील 102 पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत. तसंच 1365 वीज पुरवठा योजना देखील प्रभावित झाल्या आहेत. हिमाचल-उत्तराखंडपासून ते दिल्ली आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालपर्यंत अशाच हवामानाचा फटका बसत आहे. ऐन थंडीत पावसाने थंडी आणखी वाढवली आहे. दुसरीकडे अशीच स्थिती आणखी एक-दोन दिवस राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.