नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये 15 जून 2020 रोजी चीनसोबत झालेल्या संघर्षात शहीद झालेले बिहारचे नाईक दीपक सिंह यांची 23 वर्षीय पत्नी रेखा देवी यांनीही आपल्या पतीच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रेखा देवी या मूळच्या मध्य प्रदेशातील रीवा येथील असून त्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्या लष्करात अधिकारी म्हणून काम करणार आहेत.
शहीद दीपक सिंह बिहार रेजिमेंटच्या 16 व्या बटालियनमध्ये होते. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांना हुसकावून लावताना ते शहीद झाले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले होते. दीपक सिंह यांच्या पत्नी रेखा देवी यांना हा सन्मान मिळाला होता. परमवीर चक्र आणि महावीर चक्रानंतर वीर चक्र हा देशातील तिसरा सर्वोच्च सन्मान आहे.
रेखा देवी गेल्या शुक्रवारी सेवा निवड मंडळाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. लष्कराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अलाहाबादमध्ये पाच दिवसांच्या मुलाखतीनंतर त्यांची निवड करण्यात आली. आता त्यांना चेन्नईमध्ये प्री-सर्व्हिस ट्रेनिंग (ओटीए) दिले जाईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाने निवडलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी रेखा देवी यांना वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.