मुंबई, वृत्तसंस्था । महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत मोलाची भूमिका निभावलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चक्क राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काल संतप्त टीकाबाण सोडले. राऊत यांनी आघाडीच्या या दोन्ही बड्या नेत्यांना बिनबुडाचे राजकारणी संबोधले आहे.
शिवसेनेच्या मुखपत्रातील रोखठोक स्तंभात राऊत यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत, आघाडी सरकारचे इतर मंत्री लवकरच गजाआड होतील, असा विरोधकांकडून इशारा दिला जात आहे, हे सारे राज्य सरकार कसे सहन करते, असा राऊतांचा सवाल आहे.
दीव-दमणचे भाजप खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. याप्रकरणी भाजपचे प्रफुल्ल खोडा यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मग गृहविभागाने आत्तापर्यंत खोडा यांना चौकशीसाठी समन्स का पाठवले नाही, अशी विचारणा करत गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर राऊत यांनी बोट ठेवले आहे.
पश्चिम बंगालातील तृणमूलच्या नेत्यांमागे ईडी, सीबीआयच्या चौकशा लावल्या होत्या. मात्र बंगालच्या नेत्यांनी केंद्राला टक्कर दिली. महाराष्ट्र हा बंगालप्रमाणे का लढत नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांच्यावर विरोधकांचे आरोप होत असताना त्यांना दणका का मिळत नाही, असे राऊतांनी म्हटले आहे.