मुंबई, वृत्तसंस्था । गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. आमदार राम कदम यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे.
भारताच्या महान गायिका लता दीदींवर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच शिवाजी पार्क मैदानावर लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारण्यात यावे अशी मागणी संपूर्ण देशाची नव्हे तर जगातील कोट्यावधी संगीत प्रेमी अन लता दीदीच्या चाहत्यांची आहे.
लताजींचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्यामुळे त्यांचे स्मृतीस्थळ उभारल्यास त्यांचे चाहते येथे येऊन त्यांचे स्मरण करतील, त्यांना आदरांजली वाहतील. लतादीदींच्या चाहत्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्या ठिकाणी जगताला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ उभारावे.शिवाजी पार्क येथे लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारणे ही त्यांना अधिक योग्य श्रद्धांजली असेल, असे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
स्मारक बनवणे सोपे नाही – राऊत
या मागणीसंदर्भात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राम कदम यांच्या मागणीच्याविरोधात प्रतिक्रिया दिलीय. लतादीदींच्या स्मारकावरुन राजकारण नको, असेही राऊत म्हणालेत.त्यांनी, “काहीजण त्यांच्या स्मारकाबद्दल बोलत असले तरी त्याचं स्मारक करणं सोपे नाहीय,” असं म्हटलंय. “त्या काही राजकारणी नव्हत्या. ते असे व्यक्तीमत्व होते की त्याचे स्मारक करणे सोपे नाहीय. त्या स्वत: एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या की देशालाही विचार कारावा लागेल त्यांच्या स्मारकाबद्दल,” असे राऊत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालेत.