जळगाव – रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे मागील महिन्यात एकाच कुटुंबातील चौघा निरपराध बालकांची हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडासारख्या घटनांच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात येईल. अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी दिली.
मागील महिन्यात बोरखेडा येथे चार बालकांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडात मृत्यू पावलेल्या बालकांच्या कुटूबियांची मंत्री ॲड पाडवी यांनी आज भेट घेऊन सात्वंन केले. यावेळी आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी कैलास कडलग, विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, प्रभारी तहसीलदार संजय तायडे, आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री के. सी. पाडवी म्हणाले की, ही घटना अतिशय निंदनीय असून अशा प्रवृत्तीचा निषेध करतो. आरोपीने अशा प्रकारचे कृत्य कशासाठी केले याचा अभ्यास करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. यावेळी त्यांनी आदिवासी वसतिगृहात या हत्याकांडातील पीडित कुटुंबातील रुमलीबाई बारेला आणि मुलगा संजय बारेला यांच्याशी संवाद साधला. आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली. घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. एकाच वेळी चौघा बालकांची कुर्हाडीने निर्घृण हत्या करणे ही कोणती प्रवृत्ती आहे? हे कृत्य आरोपीने दारूच्या नशेत केले की त्याच्या मनात आणखी काही भावना होत्या याचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.