जळगाव प्रतिनिधी – आरटीई अनुदानाच्या अहवालासाठी लाच शासनाच्या आरटीई (शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांपोटी शाळेस मिळणाऱ्या अनुदानासाठी अनुकूल अहवाल देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच घेताना गटशिक्षणाधिकारी व शिक्षणतज्ज्ञास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ अटक केली.
धरणगाव येथील पंचायत समिती कार्यालयातील गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिऱ्हाडे (वय ५७, रा. राधाकृष्णनगर, पिंपळेरोड, अमळनेर) व कंत्राटी समावेशित शिक्षणतज्ज्ञ तुळशिराम भगवान सैंदाणे (वय ३४, रा. बोरोलेनगर, पंडित कॉलनी, चोपडा) असे अटक केलेल्या लाचखोरांची नावे आहेत.
तक्रारदार हे पाळधी खुर्द येथील रहिवासी असून, त्यांची पाळधी येथे शाळा आहे. शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून, सन २०१६ पासून शाळा स्वयंअर्थसाहाय्यता या तत्त्वावर चालवली जाते आहे. शासनाच्या आरटीई योजनेप्रमाणे या शाळेत एकूण १७ विद्यार्थी प्रवेशित आहेत. प्रतिविद्यार्थी ८ हजार रुपये प्रमाणे सन २०२०-२१चे १ लाख ३६ हजार रुपयांचे अनुदान शाळेला मंजूर झाले आहे. हे अनुदान मिळण्यासाठी अनुकूल अहवाल तयार करून जिल्हा परिषदेत पाठवण्याच्या मोबदल्यात बिऱ्हाडे याने ३० डिसेंबर रोजी लाच मागितली होती. ही लाच सोमवारी सैंदाणे याने कार्यालयातच स्वीकारली.
तत्पूर्वी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केली होती. त्यानुसार उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजाेग बच्छाव, एन.एन. जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांच्या पथकाने सापळा रचला होता. सैंदाणे याने लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली. यानंतर काही वेळातच बिऱ्हाडे यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.