जळगाव, प्रतिनिधी । माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्तांवर हद्दपारीची कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 14 दिवसांपासून साखळी उपोषणास बसलेले रिपाइं ( आठवले) गटाचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनांंचा ताफा अडवून प्रशासनाचा निषेध केला. यावर ना. अब्दुल सत्तार यांनी या प्रश्नी चौकशी करून योग्य न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले.
जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांच्याविरूध्द गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतांना जिल्हा पोलिस यंत्रणेने त्यांना संरक्षण दिले आहे. हे संरक्षण त्वरित काढून घेण्यात यावे व त्यांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करावे या मागणीसाठी रिपाइं आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 14 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. या सनदशीर मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची जिल्हा पोलिस यंत्रणेने व प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आज सकाळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठक आटोपून परत जात असतांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर अचानक अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनाचा ताफा अडविला व त्यांना दीपक गुप्तांवर कारवाई करण्याबाबत निवेदन सादर केले. यावर ना. सत्तार यांनी या प्रकरणी चौकशी करून योग्य तो न्याय मिळवून देण्याची ग्वाही रिपाइं कार्यकर्त्यांना दिली. यावेळी जिल्हा पोलिस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच दीपक गुप्ता यांना त्वरित हद्दपार करावे अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनात अनिल अडकमोल यांच्यासह मिलिंद सोनवणे तसेच कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.