जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या वाहनांच्या ताफ्यात आता आणखी एक नव्याने ब्राऊझर मशिनरूपी वाहन दाखल झाले आहे. या ब्राऊझर मशिनचे आज शुक्रवार, दि.21 जानेवारी 2021 रोजी सकाळी गोदावरी पीठगिरणी भागात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. यानंतर त्यांच्या उपस्थितीतच महानगरपालिकेतर्फे गोदावरी पीठगिरणी भागातील कॉलनींतर्गत रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांना सुरूवात करण्यात आली. यामुळे या परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणासह आता कॉलनी, उपनगरांतर्गत असलेले छोटे-छोटे रस्ते की ज्यांच्यावर काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे तेथील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह त्यावर डांबरीकरण करण्याच्या कामांनाही सुरूवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून आज चर्चच्या पाठीमागे असलेल्या गोदावरी पीठगिरणी भागातील रस्त्यांची डागडुजी करण्याच्या कामास महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली.तत्पूर्वी जळगाव शहर महानगरपालिकेच्या वाहनांच्या ताफ्यात आता आणखी एक नव्याने ब्राऊझर मशिनरूपी वाहन दाखल झाले आहे त्याचे पूजनही त्यांच्या हस्ते झाले. महापालिकेकडे केवळ एकच ब्राऊझर मशिन असल्याने शहरातील रस्त्यांची डागडुजी करताना त्यावरच ताण येत होता. या पार्श्वभूमीवर महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी महापालिका प्रशासनाकडे आणखी एक ब्राऊझर मशिन खरेदी करण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता, तो मंजूर होऊन आज ते जळगाव शहर महानगरपालिकेच्या वाहनांच्या ताफ्यात दाखल झाले. त्यामुळे आता शहरातील गल्लीबोळांतील रस्त्यांवरील खड्डे डांबर व खडी टाकून लवकरात लवकर बुजविले जातील.
ब्राऊझर मशिनरूपी वाहनाच्या पूजनावेळी महापालिका अधिकारी, कर्मचार्यांसह वाहन विभाग तसेच आरोग्य, बांधकाम, स्वच्छता आदी विभागांचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.