पुणे, वृत्तसंस्था । पुण्यात आज सकाळी डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे.
रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही रेल्वे दौंडच्या दिशेने जात होती त्यावेळी ही घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
आठ डब्ब्यांची डेमू रेल्वे दौंडच्या दिशेने जात होती. यामध्ये कोणताही प्रवासी नव्हता. ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर लागणारच होती. मात्र दरम्यान, चौथा डबा सकाळी साडे नऊ वाजता रुळावरून घसरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आता ही गाडी रद्द करण्यात आली असून इतर सर्व गाड्या सुरळीत सुरू आहेत. या प्रकाराच्या तपासासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल लवकरच सादर करेल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.