मुंबई – राज्य सरकारने 50 टक्के प्रेक्षकसंख्येच्या नियमासह थिएटर्स खुली करण्याला परवानगी दिल्यानंतर अनेक मोठ्या सिनेमांनी पुन्हा एकदा आपल्या प्रदर्शनाची तारीख नव्याने ठरवायला घेतली आहे. अशात कमालीचा लोकप्रिय झालेला बाहुबली हा चित्रपट या शुक्रवारपासून म्हणजेच आजपासून थिएटरमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. तर पुढच्या शुक्रवारी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. तर ’83’ हा चित्रपट मात्र पुढच्या वर्षात जाणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
कोरोनाच्या काळाने अनेकांची गणितं चुकवली. तब्बल आठ महिने थिएटर्स बंद होती. त्यामुळे ज्यांनी आपापले सिनेमे आणि त्यांच्या तारखा जाहीर केल्या होत्या त्या सगळ्या गडबडल्या. त्यानंतर ओटीटीवाल्यांनी जोरदार मुसंडी मारली. सिनेमे घ्यायला सुरुवात केली. त्यावरुनही बरीच आरडाओरड झाली. थिएटर लॉबी विरुद्ध निर्माते असा सामना काहीकाळ रंगला. या सगळ्यात थिएटरवाल्यांची भिस्त होती सूर्यवंशी आणि 83 या दोन सिनेमांवर. हे दोन सिनेमे काय करणार याकडे सर्वाचं लक्ष होतं. हे दोन्ही सिनेमे नव्या वर्षात जातील. तर थिएटर खुली व्हायला परवानगी मिळाल्यानंतर एसएस राजामौली दिग्दर्शित बाहुबली-द बीगिनिंग आणि बाहुबली-द कन्क्लुजन हे दोन्ही चित्रपट एकामागोमाग एका शुक्रवारी प्रदर्शित होणार आहेत. पहिला भाग 6 नोव्हेंबरला तर दुसरा भाग 13 नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.
राज्य सरकारने नुकतीच थिएटर उघडण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर सर्वच चित्रपटनिर्मात्यांनी आपापल्या चित्रपटाचं प्लॅनिंग करायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारने 50 टक्के प्रेक्षकसंख्येच्या अटीवर थिएटर्स खुली करण्याला परवानगी दिली आहे. असं असलं तरी अद्याप एक पडदा थिएटर्स मात्र सरकारच्या नव्या नियमावलीची वाट पाहणार आहेत. तर मल्टिप्लेक्सवाल्यांनी मात्र कोणते सिनेमे कसे रिलीज करायचे याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. सध्या ‘पीएम नरेंद्र मोदी’, ‘खालीपिली’ हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहेत. तर ‘मलंग’ हा चित्रपटही पुन्हा प्रदर्शित होणार आहे. मराठीमध्ये ‘विजेता’ या चित्रपटाची टीम चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा विचार करत आहे. या शिवाय यांच्या जोडीला आता बाहुबलीचे दोन चित्रपटही असणार आहेत.
अजून वाचा
करोना काळात गरजुंना मदत केल्यामुळे प्रशांत दामलेंचा सन्मान