करोनामुळे ओढावलेल्या संकटामुळे देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला. या काळात अनेक उद्योग -व्यवसाय ठप्प झाले. परिणामी, अनेकांवर उपासमारीची वेळ आली. यामध्येच कलाविश्वातील कामकाजदेखील बंद असल्यामुळे रोजंदारीवर काम करणारे, पडद्यामागील कलाकार यांनादेखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परंतु, अभिनेते प्रशांत दामले यांनी संकट काळात पडद्यामागील कलाकारांसाठी मदतीचा हात पुढे केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याच्या हस्ते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला.
करोना विषाणूमुळे नाट्यव्यवसायावर आलेले सावट पाहता, प्रशांत दामले यांनी आपल्या सर्व पडद्यामागील कलावंतांना आर्थिक मदत केली. एकूण २३ जणांना त्यांनी प्रत्येकी ठराविक रकमेची वाटप केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांनी जपलेलं सामाजिक भान पाहता त्यांचा आज सत्कार करण्यात आला. त्यांच्यासोबतच निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई यांचादेखील सन्मान करण्यात आला.
“अनादी काळापासून आपल्या देशातील लोकांमध्ये समाजसेवेची आवड आहे. जनसेवा ही ईशसेवा मानली गेली आहे. समाजाला देणे ही संस्कृती लोकांच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. त्यामुळे करोना काळात समाजासाठी काम करण्याची अहिमहीका बघायला मिळाली”, असं राज्यपालांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, प्रशांत दामले, सुभाष घई, अलका केरकर यांच्यासह विविध इस्पितळांमधील डॉक्टर्स, परिचारिका, वार्ड बॉईज, स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य देणारे, गरजू व्यक्तींना व संस्थांना मोफत मास्क, सॅनिटायझर्स, पीपीई किट्स पुरविणाऱ्या दानशूर व्यक्ती अशा ४५ करोना योद्ध्यांच्या सत्कार करण्यात आला.