अबू धाबी : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सोमवारी होणाऱ्या ‘आयपीएल’ लढतीत विजयी संघ बाद फेरीमधील जागा पक्की करू शकेल, तसेच गुणतालिकेत दुसरे स्थानही मिळवू शकेल. मात्र हरणाऱ्या संघाचा बाद फेरीचा मार्ग बिकट होऊ शकेल. परिणामी पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येऊ शकेल किंवा निव्वळ धावगतीवर ते तरू शकतील.
‘आयपीएल’च्या पूर्वार्धात दिमाखदार प्रारंभ करणाऱ्या बेंगळूरु आणि दिल्ली या दोन्ही संघांनी मागील अनुक्रमे चार आणि तीन सामने गमावले आहेत. त्यामुळेच सोमवारच्या सामन्याला उपांत्यपूर्व फेरीचेच स्वरूप प्राप्त झाले आहे.
सलामीच्या स्थानांसाठीचे अस्थर्य ही दिल्लीची प्रमुख चिंता आहे. शिखर धवनला पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे हे दोघेही तोलामोलाची साथ देऊ शकलेले नाही. धवनने दोन सलग शतकांनिशी सूर गवसल्याची ग्वाही दिली, पण मागील तीन सामन्यांत तो अनुक्रमे ०, ० आणि ६ धावांवर झगडताना आढळला आहे.
कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांच्यावर अतिविसंबून राहिल्यामुळे बेंगळूरु अपयशी ठरत असल्याचे म्हटले जात आहे.