मुंबई : दिवाळीत अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक मॉलनी खरेदीवर सवलती देण्याबरोबरच घर, मोटार ते सोन्या-चांदीच्या नाण्यापर्यंतच्या अनेक बक्षीस योजना जाहीर केल्या आहेत.
शहर आणि उपनगरांतील अनेक मॉलनी सवलतींच्या जोडीला सोडत योजनांचा धडाका लावला आहे. आलिशान चारचाकी मोटार, सोन्या-चांदीची नाणी आणि नव्या गृहनिर्माण प्रकल्पात घर जिंकून देणारे लकी ड्रॉ, उपाहारगृहातील खरेदीवर अधिक सवलत अशा योजनांचा त्यात समावेश आहे. या योजनांमुळे येत्या पंधरवडय़ात ग्राहकांची संख्या वाढेल, अशी आशा मॉल व्यवस्थापनांना आहे.
नवरात्री आणि दसऱ्यानिमित्त अनेक ग्राहकांचे पाय मॉलकडे वळले. ग्राहकांच्या प्रतिसादात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी अद्याप करोनापूर्व काळाइतका प्रतिसाद मिळत नसल्याचे व्यवस्थापनांनी सांगितले. मात्र दिवाळीत काही ना काही खरेदी केली जाते. त्यामुळे ग्राहकांची संख्या वाढण्याची अपेक्षा मॉलचालकांना आहे. टाळेबंदीमुळे घरी बसून कंटाळलेल्यांना ही दिवाळी स्वत:साठी साजरी करा, अशी भावनिक साद घालणाऱ्या जाहिरातीही काही मॉलनी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.
टाळेबंदीत साडेचार महिने बंद असलेले मॉल ५ ऑगस्टपासून पुन्हा सुरू झाले. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांत अनेक मॉलना आठवडय़ाच्या शेवटच्या दिवसांत करोनापूर्व काळाच्या तुलनेत सुमारे ४० टक्के प्रतिसाद मिळाला. नवरात्री आणि दसऱ्याच्या निमित्ताने ग्राहकांच्या संख्येत २० टक्के वाढ झाल्याचे नवी मुंबई येथील सी वूड्स मॉल आणि घाटकोपर येथील आर सिटी मॉलच्या प्रवक्त्यांनी सांगितले. आता दिवाळीच्या अनुषंगाने अनेक मॉल व्यवस्थापनांनी ३० ऑक्टोबरपासूनच नवनवीन योजना जाहीर केल्या आहेत. तसेच मॉलनी दिवाळीसाठी नेत्रवेधक, आकर्षक सजावटही केली आहे.
सोडत योजनांमध्ये काय?
-पश्चिम उपनगरातील ओबेरॉय मॉल आणि ठाण्यातील विवियाना मॉलने ठरावीक खरेदीवर सोडत योजनेत कार, तर घाटकोपरच्या आर सिटी मॉलने घराचे बक्षीस जाहीर केले आहे.
-अगदी दोन हजार रुपये ते १० हजार रुपयांच्या खरेदीवर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, सोन्या-चांदीची नाणी आदी बक्षिसेही अनेक मॉलचालकांनी ठेवली आहेत.
खाद्यपदार्थामध्येही सवलती
बहुतांश मॉलमध्ये फूड कोर्टसाठी अधिक सवलती देण्यात आल्या आहेत. इतर वस्तूंच्या खरेदीपेक्षा उपाहारगृहातही पाच टक्क्यांपर्यंत रिवॉर्ड पॉइण्ट्स, तसेच अधिक सवलती देण्यावर मॉलचा भर आहे. मॉलमधील उपाहारगृहे सुरू झाल्यानंतर गेल्या महिनाभरात ग्राहकांचा प्रतिसाद काही प्रमाणात वाढल्याचे अनेक मॉलच्या प्रवक्त्यांनी सांगितले.