जळगाव प्रतिनिधी – जिल्हा परिषदेतील असमान निधी वाटपाच्या मुद्द्यावर करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषदेतील कामांना स्थगिती दिली आहे. या स्थगिती पत्रामुळे सर्वाधिक कामांचा गाेंधळ असलेल्या बांधकाम विभाग आणि सिंचनाच्या कामांना ब्रेक लागणार आहे.
जिल्हा परिषदेत २४ काेटी रुपयांच्या कामे १० ते १२ सदस्यांनी आपसात वाटली आहेत. या कामांमुळे अन्य सदस्यांच्या भाैगाेलिक क्षेत्रात समान निधीचे वाटप न झाल्याने त्याचा विकासकामांवर परिणाम झालेला आहे. ही बाब राष्ट्रवादीच्या सदस्या प्रा. डाॅ. नीलम पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे लेखी तक्रारीच्या रूपाने सांगितली आहे. या तक्रारीची दखल घेत या कामांची चाैकशी करावी आणि चाैकशी सुरू असे पर्यंत कामांना स्थगिती देण्यात येत असल्याचे पत्र शासनाकडून जिल्हा परिषदेला देण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेतील पहिल्या फळीतील पदाधिकारी आणि सदस्यांसाठी ही बाब अडचणीची ठरली आहे. कामांना स्थगिती मिळणार नसल्याचा दावा या सदस्यांकडून केला जात हाेता. केवळ चाैकशी हाेणार असून या काळात कामे सुरूच ठेवण्याचे या सदस्यांकडून सांगण्यात येत हाेते. दरम्यान, कामांच्या चाैकशीसह स्थगितीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर मात्र सत्ताधारी शांत झाले आहेत.
सिंचन आणि बांधकाम विभागाकडून कामे आहे त्याच टप्प्यात थांबवण्यात आली आहेत. साेमवारी या कामाबाबत पदाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागप्रमुख या कामांचा अहवाल देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने हालचालीदेखील सुरू झाल्या आहे.