जळगाव प्रतिनिधी । गुरे चारण्याच्या कारणावरून एकाला दोन जणांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंडारी येथील रहिवाशी राजू शेख बाबु (वय-५४) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते शेतीचे काम करून उदरनिर्वाह करतात. गुरूवार १३ जानेवारी रोजी राजू शेख बाबु यांच्या शेताच्या बांधावर भाऊसाहेब राजेंद्र सुर्वे याने गुरे चारण्यासाठी सोडले होते. याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवार १४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता राजू शेख बाबु हे घरी गेले असता याचा राग असल्याने भाऊसाहेब राजेंद्र सुर्वे आणि मयुर विश्वासराव सुर्वे रा. कंडारी ता.जि.जळगाव यांनी चापटाबुक्क्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी राजू शेख बाबु यांच्या फिर्यादीवरून दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ शेख गफुर शेख कादर हे करीत आहे.