जळगाव – शहरातील रामदास पार्कवरील प्रशस्त उद्यानाच्या साकारण्यास आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. स्थानिक नगरसेवक अनंत जोशी यांच्या पाठपुराव्यानंतर काम सुरु झाले असून मकरसंक्रांतीच्या मंगल पर्वावर महापौर व जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांनी पाहणी केली आली. या कामामुळे शहरातील नागरिकांना दिलेल्या वचनपूर्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले गेले आहे.
शहराच्या मुख्य परिसरात असलेल्या रामदास कॉलनीतील रामदास पार्क मैदानावर उद्यान विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी ठराविक नागरिकांच्या विरोधामुळे तो प्रकल्प रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शिवसेनेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी महापौर जयश्री महाजन यांनी कामाची पाहणी केली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, प्रभाग क्र.12 चे नगरसेवक नितीन बरडे, अनंत ऊर्फ बंटी जोशी, शिवसेनेचे पदाधिकारी प्रशांत सुरळकर याप्रसंगी उपस्थित होते.
रामदास पार्कवरील उद्यानाच्या कामासाठी 83 लाख रुपये निधी महापालिकेतर्फे मंजूर करण्यात आलेला असून, हा निधी खर्च करण्याची मुदत दोन महिने असल्याने हे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. यावेळी सर्व मान्यवरांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून संबंधित ठेकेदाराकडून विस्तृत माहिती घेऊन त्यांना सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासह गुणवत्तेचा दर्जा राखण्यासंदर्भात काही मौलिक सूचनाही केल्या. या उद्यानाच्या कामासंदर्भात प्रभाग क्र. 12 चे नगरसेवक नितीन बरडे व अनंत ऊर्फ बंटी जोशी यांनी सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा सुरू ठेवलेला होता. त्यामुळे आता लवकरात लवकर एक सुंदर भव्य उद्यान नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळणार आहे.
उद्यान उभारणीचे आणि विकसित करण्याचे उर्वरित काम सीएसआर फंडच्या माध्यमातून केले जाणार आहे. जळगावकरांना आणखी एक सुसज्ज उद्यान मिळणार आहे. परिसरातील नागरिकांनी नगरसेवक आणि महापौरांचे आभार मानले आहेत.