जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील दिपनगर जवळ रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे भुसावळ तालुका अध्यक्ष यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे भुसावळ तालुका अध्यक्ष महेश मोहनदास पटेल यांच्यावर ७ रोजी प्राणघातक हल्ला झाला आहे. दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच भुसावळ शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दिपनगर नजीक हॉटेल सरगम जवळ महामार्गालगत मंगळवारच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी महेश पटेल यांच्यावर हल्ला केला आहे. जखमी पटेल यांना वैद्यकीय उपचारार्थ सुरुवातीला ट्रामा केअर व नंतर साईपुष्प हॉस्पीटल भुसावळ येथे दाखल करण्यात आले आहे.
विजय कैलास सोनवणे आणि महेश पटेल हे दोघे जण बुलेटने जात असतांना संतोष विश्वनाथ भगत याने दारुच्या नशेत दोघांना अडवले. तुला बघून घेईन तुझ्यावर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन असे म्हणत संतोष भगत याने महेश पटेल यांच्यावर कोणत्यातरी शस्त्राने हल्ला केला. त्यात दोघे जखमी झाले. घटनेचे वृत्त समजताच पो.नि. विलास शेंडे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वानखेडे करत आहेत.