जळगाव प्रतिनिधी – घरकुल घाेटाळ्यात शिक्षा झालेल्या भाजपच्या महापालिकेतील चार नगरसेवकांविरुद्ध अपात्रतेची टांगती तलवार अद्याप ही कायम आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बालाणी, ढेकळे, काेळी, साेनवणे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देत अर्ज फेटाळला.
राज्यभरात गाजलेल्या घरकुल घाेटाळ्यात तत्कालीन आमदारांसह आजी-माजी नगरसेवकांना शिक्षा ठाेठावण्यात आली आहे. शिक्षेनंतरही २०१८मध्ये महापालिकेची निवडणूक लढवलेल्या व विजयी झालेल्या पाच नगरसेवकांविरुद्ध जळगाव न्यायालयात अपात्रतेचा दावा सुरू आहे. या दाव्यात महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करत पाचही नगरसेवकांना शिक्षा झाल्याने त्यांना अपात्र करण्यात यावे असे म्हणणे मांडले आहे. त्यानंतर पाचही नगरसेवकांना न्यायालयाने नाेटीस बजावली हाेती.
या नाेटीस विराेधात शिक्षा ठाेठावलेले भाजपचे गटनेते भगत बालाणी, माजी महापाैर सदाशिव ढेकळे, दत्तात्रय काेळी व स्वीकृत नगरसेवक कैलास साेनवणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत शिक्षेला स्थगिती मिळावी अशी विनंती केली हाेती. या प्रकरणात मंगळवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांच्या न्यायासनासमाेर कामकाज झाले. त्यात न्यायालयाने भाजपच्या चारही विद्यमान नगरसेवकांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. नगरसेवकांच्या वतीने अॅड. सचिंद्र शेटे तर सरकारच्या वतीने अॅड. प्रवीण चव्हाण यांनी कामकाज पाहिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने शिक्षा झालेल्या विद्यमान चारही नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.
जळगाव न्यायालयात आज कामकाज : शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जळगाव न्यायालयात पाचही नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी दावा दाखल केला आहे. स्पेशल सिव्हिल सूट म्हणून जळगाव काेर्टाने नाेंदवला आहे; परंतु हा दावा स्पेशल नसून रेग्युलर मुकदमा हवा अशी मागणी पाचही नगरसेवकांच्या वतीने करण्यात आली हाेती. त्यात नगरसेवकांचा अर्ज फेटाळल्याने पाचही जणांनी अाैरंगाबाद खंडपीठात धाव घेतली हाेती. त्यात खंडपीठाने जळगाव न्यायालयात दाखल दावा हा इलेक्शन पिटिशन असल्याने त्यानुसार सुनावणी घेण्याचे आदेश दिले हाेते. त्यात पाचही नगरसेवकांनी पुन्हा नव्याने कामकाज सुरू करावे अशी मागणी केली आहे. याप्रकरणी वादी प्रशांत नाईक यांच्या वतीने अॅड. सुधीर कुलकर्णी यांनी खुलासा सादर केला आहे. त्यावर बुधवारी कामकाज हाेणार आहे.


