तामिळनाडू, वृत्तसंस्था । तामिळनाडूमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर येथील डोंगळार भागामध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते असं वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. या अपघातानंतर भारतीय हवाई दलाने पहिली प्रतिक्रिया देताना जनरल बिपीन रावत हेलिकॉप्टरमध्ये होते या वृत्ताला दुजोरा दिलाय.
भारतीय हवाई दलाचे एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरमधून संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतही प्रवास करत होते. या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ अपघात झाला आहे. हा अपघात कसा झाला याचा तपास करण्यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत,” असं हवाई दलाने म्हटलं आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या एमआय सीरिज हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून स्थानिकदेखील मदत करत आहेत. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत आहेत. वेलिंग स्टाफ कॉलेजमध्ये लेक्चर देण्यासाठी जात होते. लष्करातील अधिकारी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.