जळगाव, प्रतिनिधी | शेतीच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली यात एक जण जखमी झाल्याची घटना घडली याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील भोकर येथे शेतीच्या वादातून शनिवार, ४ डिसेंबर रोजी दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या हाणामारीत एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी सोमवार, ६ डिसेंबर रोजी चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव तालुक्यातील भोकर येथे सुकलाल पंडीत सोनवणे (वय ४२) हे वास्तव्यास आहेत. सुकलाल सोनवणे हे शेती करतात. त्यांचा गावातीलच बाळू रामकृष्ण सोनवणे यांच्यासोबत शेतीचा वाद आहे.
या वादावरुन शनिवार दि. ४ डिसेंबर रोजी सुकलाल सोनवणे यांच्याकडे बाळू रामकृष्ण सोनवणे यांच्यासह इतर तीन जण आले. त्या सर्वांनी सुकलाल सोनवणे यांना उद्देशून तुम्हाला जास्तीचे शेत पाहिजे आहे का असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यादरम्यान बाळू सोनवणे याने सुकलाल सोनवणे यांना कुर्हाडीच्या दांडक्याने डोळ्याजवळ व पाठीवर मारहाण केली. याचवेळी सुकलाल सोनवणे यांचा मुलगा सागर याला सुध्दा चौघांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. अशा सुकलाल सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सोमवार, ६ डिसेंबर रोजी तालुका पोलिसात बाळू रामकृष्ण सोनवणे, विनोद बाळू सोनवणे, ईश्वर बाळू सोनवणे व रामकृष्ण बाळू सोनवणे सर्व रा. भोकर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.