पारोळा प्रतिनिधी । करमाड येथील राहणाऱ्या विवाहितेचा तिच्या दोन मुलांसह अपहरण केल्याची तक्रार एकाने दाखल केली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील करमाड खुर्द येथील रहिवासी विनोद बोरसे यांच्या फिर्यादीनुसार सात जणांनी मिळून त्यांची पत्नी आणि दोन मुलांना पळवून नेले आहे. २४ रोजी दुपारी ते शेतात गेले होते. त्यावेळी करमाड, रताळे गावांदरम्यान पांढर्या इनोव्हा कारमध्ये त्यांना त्यांची मुले दिसली. त्यांनी कारजवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांच्या पत्नी आरती बोरसे, सात वर्षांचा मुलगा रुपेश व पाच वर्षाचा दर्शन हे देखील कारमध्ये होते. त्यांनी या कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर ही कार वेगाने निघून गेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, कैलास नानाभाऊ बोरसे, नानाभाऊ कौतिक बोरसे, समाधान नानाभाऊ बोरसे, कमलबाई पिरण पाटील, पिरण राजधर पाटील, कमलबाई नानाभाऊ पाटील (सर्व रा. करमाड खुर्द) यांनी त्यांचे अपहरण केले. संशयितांना अडवले असता त्यांनी बोरसे यांना मारहाण केली, तसेच ठार मारण्याची धमकी दिली. संशयितांनी विवाहितेसह मुलांना लोणावळा येथील फार्महाऊसवर ठेवले असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.