जळगाव, प्रतिनिधी । पाचोरा येथील एका साॅफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला अमेरिकेत असल्याचा बहाणा करणाऱ्या तरुणाने अडीच लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी तरुणीने जळगाव सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे.
विवाहेच्छुकांच्या संकेतस्थळांवर असलेल्या माहितीची खातरजमा न करताच विश्वास ठेवणाऱ्या पाचोरा येथील एका साॅफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला अमेरिकेत असल्याचा बहाणा करणाऱ्या तरुणाने अडीच लाखांना फसवले आहे. लग्नासाठी एक कोटी रुपयांचे दागिने आणि अमेरिकन चलन पाठवल्याचा बहाणा करून त्यासाठीचा वस्तू व सेवाकर म्हणून ही रक्कम त्याने तिच्याकडून उकळली आहे. पाचोऱ्याची रहिवासी ही तरुणी पुण्यात साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते. मराठी मेट्रेमनी साइटवर ती वर संशोधन करत होती. त्यासाठी साइटवर तिने आपला प्रोफाइल फोन क्रमांकासह अपलोड केला होता. त्या क्रमांकावरून ४ नोव्हेंबरला निवांत चित्रे असे नाव सांगणाऱ्या तरुणाने तिच्याशी संपर्क केला आणि लग्नाची बोलणीही केली. आपण अमेरिकेतील ग्लासगो येथे राहत असल्याची बतावणी त्याने केली. प्राथमिक बोलणी झाल्यानंतर दोघांचा फोनद्वारे संपर्क वाढला होता. लग्नाचा निर्णय झाल्यानंतर त्या तरुणाने तिला भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. त्यात सोने व हिऱ्यांचे दागिने तसेच १ हजार पाउंडच्या नोटा असल्याचे व्हिडिओ काॅल करून दाखवलेही होते. त्याची किंमत एक कोटी रुपये असल्याचा दावा त्याने केला होता. हे पार्सल दिल्लीत विमानतळावर अडकले असून कस्टम ड्यूटी आणि जीएसटी भरावा लागेल, असे त्याने सांगितले. तो भरण्यासाठी तिच्याकडून दोन लाख ५५,५०० रुपये मागवून घेतले. ती रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क साधणे बंद केले. प्रयत्न करूनही संपर्क होत नाही हे स्पष्ट झाल्यावर फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. याप्रकरणी जळगावच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे.