भुसावळ प्रतिनिधी | रेल्वेतून प्रवास करणार्या महिलेच्या पर्समधून ५ लाख ६२ हजार रूपयांची चोरी करणाऱ्या लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने चोवीस तासाच्या आत त्याला अटक केली असून व त्याच्याकडून मुद्देमाल हि हस्तगत करण्यात आला आहे.
गीता बेन योगेश पटेल, वय ३८ वर्षे, रा. सुरत, गुजरात ह्या २१ नोव्हेंबर रोजी ट्रेन क्र.०२८४४ डाऊन अहमदाबाद-पुरी एक्सप्रेसचे कोच क्र.ए-१, बर्थ क्र.४१ वरून सुरत ते रायपुर असा प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान सुमारे ०४.२० ते ०४.४५ वा.चे दरम्यान नमुद ट्रेन रेल्वे स्टेशन जळगाव ते भुसावळ चे दरम्यान असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्या निद्रेत असतांना बर्थवर ठेवलेली लेडीज पर्स चोरून ट्रेनच्या बाथरूममध्ये नेवून पर्समधील १) एक सोन्याचे मंगळसुत्र २) एक सोन्याचा गळ्यातील हार ३) दोन सोन्याच्या गळ्यातील चैन ४) एक सोन्याची कानातील रिंग ५) एक सोन्याची अंगठी ६) एक ग्रे रंगांचा सँमसंग कंपनीचा मोबाईल फोन मॉं.क्र.ए-२२, ७) रोख १,०००/- रूपये असा एकूण ५,६२,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या संदर्भात गीताबेन योगेश पटेल यांनी बडनेरा येथे फिर्याद दिल्यामुळे शुन्य क्रमांकाने गुन्हा दाखल होवून नमुद गुन्ह्याची कागदपत्रे इकडील पो.स्टे.ला प्राप्त झाल्याने रे.पो.स्टे.भुसावळ येथे गु.र.क्र.६२३/२०२१ कलम ३७९ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, नमुद गुन्ह्याचा तपास करीत असताना रेल्वे स्टेशन भुसावळ येथील सीसीटिव्ही फुटेजच्या सहाय्याने नमुद ट्रेनमधून भुसावळ रेल्वे स्टेशन येथे उतरलेल्या प्रवाशांच्या हालचाली बारकाईने पाहिल्या असता एक संशयीत पायाने अपंग असलेला इसम नमुद ट्रेन मधून उतरून प्लॅटफॉर्म फिरून स्टेशनच्या उत्तर बाजूस बाहेर जावून रिक्षाने गेला असल्याचे दिसले.
रिक्षा चालकाचा शोध घेवून त्याचेकडे केलेल्या चौकशीत नमुद संशयीत पायाने अपंग असलेला इसम हा कन्हैया कुंज हॉंटेल, भुसावळ जवळ उतरला असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून गोपनिय माहितीच्या आधारे नमुद पायाने अपंग असलेल्या इसमा बावत माहिती मिळवली असता त्याचे नाव साबीर लंगडा असून तो सराईत गुन्हेगार असून सुरत येथे राहत असल्याचे समजले. या अनुषंगाने लोहमार्गा पोलिसांनी सुरत येथे पोलीस तपास पथक पाठवून गोपनिय माहितीच्या आधारे साबीर लंगडा याचा शोध घेतला असता तो मिळून आला. त्याचे नाव अब्दुल साबीर रहेमान शेख उर्फ लंगडा, (वय ३० वर्षे, रा. बि.नं.०९, वी-ब्लॉक, वेस्तान आवास, सचिन रोड, पो.ठाणे- दिंडोली, सुरत) असे असून त्यास ताब्यात घेवून येथे आणून त्यास नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.नमुद आरोपीकडून सुरत, गुजरात येथे गुन्ह्यातील वर नमूद केलेला सर्वच्या सर्व ५,६३,६२०/- रूपये किमतीचा मुद्देमाल त्याचेकडून हस्तगत करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी औरंगाबाद येथील लोहमार्ग पोलिसाच्या अधिक्षक मोक्षदा पाटील, आरपीएफ कमांडंट क्षितीज गुरव, डीवायएसपी मनमाड दिपक काजवे, पोलिस निरिक्षक भुसावळ विजय घेरडे, आरपीएफ निरिक्षक राधाकृष्ण मीना, सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरीक्षक श्री. संजय साळुखे, रे.पो.स्टे.भुसावळ, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे हवालदार ठाकुर, हवालदार लुले, हवालदार खंडारे, भुषण पाटील, कैलास बोडके यांनी अथक परिश्रम केले. या गुन्ह्याचा तपास केल्याबद्दल अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी या पथकाला पाच हजार रूपयांचे पारितोषीक जाहीर केले आहे.