धुळे, प्रतिनिधी । तालुक्यातील शिरपूर येथे लाकड्या हनुमान शिवारात पोलिसांनी छापा टाकून सुमारे ७ लाख २० हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शिरपूर येथे लाकड्या हनुमान येथील शेतात प्रदीप वेस्ता पावरा नामक व्यक्तीने शेतात गांजा लावला होता. याविषयीची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिस अधिकारी सुरेश शिरसाठ व त्यांच्या पथकाने छापा टाकाला. शेतात सुमारे ३ ते ५ फुटांपर्यंत वाढलेली गांजाची रोपे आढळली. सर्व रोपे पोलिसांनी तोडून जप्त केली. या कारवाईत सुमारे ३६० किलो गांजा जप्त करण्यात आला. त्यांची किंमत सुमारे ७ लाख २० हजार रुपये आहे.
या कारवाईची चाहूल लागण्यापूर्वी संशयित प्रदीप पावरा पसार झाला होता. उपअधीक्षक ईश्वर कातकाडे यांनी पथकाचे कौतुक केले. शिरपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी सुरेश शिरसाठ, उपनिरीक्षक खैरनार, कर्मचारी नियाज शेख, गवळी, ठाकूर, गंगाराम सोनवणे, मंगेश मोरे, सईद शेख, आरिफ पठाण, मुकेश पावरा, प्रकाश भील, मोरे, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. लाकड्या हनुमान येथील शेतामध्ये पाच फुटापर्यंत गांजाची झाडे आढळली.