जळगाव प्रतिनिधी | चाईल्ड पोर्नोग्राफीचा प्रसार करणार्यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने धाडसत्र टाकले असून यात जळगावातही छापे मारण्यात आले आहेत. यामुळे या भयंकर प्रकाराचे धागेदोरे हे जळगावपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट झाले. चाईल्ड पोर्नोग्राफीच्या विरूध्द सरकारने कठोर भूमिका घेतली असतांनाही याचा सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने सीबीआयने मंगळवारी दिवसभरात देशभरात छापे टाकले.
ऑनलाइन बाल लैंगिक शोषण सामग्रीशी संबंधित गुन्ह्यांवर देशव्यापी समन्वित कारवाईमध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने १४.११.२०२१ रोजी ८३ आरोपींविरुद्ध ऑनलाइन बाल लैंगिक शोषण आणि शोषणाशी संबंधित आरोपांवर २३ स्वतंत्र प्रकरणे नोंदवली. यानंतर काल म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी देशभरात छापे टाकण्यात आले. यात जळगावातही छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआयने आपल्या अधिकृत प्रेस नोटमध्ये दिलेली आहे. तर या संदर्भातील अधिक माहिती अद्याप दिलेली नाही. सीबीआयने केलेल्या तपासात आजवर सोशल मीडियातून आणि त्याही व्हाटसऍप ग्रुप्सच्या माध्यमातून बाल लैंगीक शोषण साम्रग्रीला मोठ्या प्रमाणात शेअर करत असल्याचे दिसून आले आहे.
यासाठी त्यांना पैसे मिळत असल्याची माहिती देखील प्राथमिक तपासात समोर आली आहे. या प्रकरणी आता जळगावातून कुणावर नेमकी कारवाई करण्यात आली याची माहिती सीबीआयकडून लवकरच समोर येऊ शकते. तर याच प्रकरणी धुळ्यातही छापेमारी करण्यात आल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.