जळगाव- भिकमचंद जैन नगरात आज सकाळी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुटुंबिय झोपल्याचा फायदा घेत घरातील एलसीडी, तीन मोबाईलसह रोकड लंपास केल्याची घटना घडली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यश संजय ठाकूर (वय-२९) रा. प्लॉट नं. ५७, वाघळूद नगर, गौरी प्राईडच्या गल्लीत, भिकमचंद जैन नगर हे आईसोबत घरी राहतात. यश हा कोल्ड्रींग कंपनीत सेल्समनचे काम करतो. मध्यरात्री उशीरा १ ते २ वाजेच्या सुमारास नळाला पाणी येत असल्याने त्यांनी पाणी भरण्यासाठी मोटार सुरू ठेवली. पाणी भरत असल्याने त्यांनी लोखंड दरवाजा ओढून मधला लाकडी दरवाजा ढकलून लावला होता.
थोडावेळ ते पलंगावर पुन्हा झोपले. बाजूला त्यांची आई देखील झोपल्या होत्या. मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरातील एलसीडी टिव्ही, तीन मोबाईल, इस्त्री, घड्याळ, बँकेचे पासबुक, गॅसबुक, देवाची दानपेटी आणि २ हजार २०० रूपये रोख असा मुद्देमाल लंपास केला. घरी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर यश ठाकूर यांनी शहर पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. यश ठाकूर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.