व्हिएन्ना – व्हिएन्नातील वैद्यकीय विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार करोनाचे एकूण सात लक्षणे निष्पन्न झाले आहे. कोविड १९ संसर्गातून निर्माण होणाऱ्या लक्षणांचे सात नवीन प्रकार वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत. करोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतरही दहा आठवडय़ांच्या काळात प्रतिकारशक्ती प्रणालीत बदल झालेले दिसून आले आहेत. या संशोधनाचा उपयोग करोना रुग्णांनी नंतर कशी काळजी घ्यावी किंवा सक्षम लस नेमकी कशा स्वरूपाची असावी हे ठरवण्यासाठी होणार आहे.
अॅलर्जी या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनात कोविड १९ चा संसर्ग झालेल्या १०९ रुग्णांची व ९८ आरोग्यवान व्यक्तींची तपासणी करून त्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. या लक्षणांमध्ये फ्लू सदृश ताप, थंडी, थकवा व कफ यांचा समावेश आहे. दुसऱ्या प्रकारात सर्दीसारखी लक्षणे म्हणजे शिंका, घसा कोरडा पडणे, नाक दुखणे , स्नायुदुखी यांचा समावेश आहे. काही रुग्णांमध्ये डोळे व श्लेष्मल आवरणाची आग होते. फुफ्फुसाच्या समस्या, न्यूमोनिया,श्वास घेण्यात अडथळे, आतडय़ाच्या समस्या जसे की, अतिसार, मळमळणे, डोकेदुखी, वास व चव जाणे या सारख्या लक्षणांचाही समावेश आहे.
कोविड १९ विषाणू नेमके काय परिणाम शरीरात करतो याबाबत उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, मानवी प्रतिकारशक्ती प्रणालीतील ग्रॅन्युलोसाइटस या पेशी जीवाणू तसेच विषाणूंशी लढण्याचे काम करतात. कोविड १९ रुग्णात त्या कमी झालेल्या दिसून आल्या. सीडी ४ व सीडी ८ टी पेशी या प्रतिकारशक्तीतील स्मृती पेशींच्या संचाचे काम करतात त्यातील सीडी ८ टी नावाच्या पेशी जास्त क्रियाशील झालेल्या दिसून आल्या. याचा अर्थ सुरुवातीच्या संसर्गानंतर या पेशी बराच काळ लढत राहतात.
अनेक रुग्णांच्या रक्तात प्रतिपिंड निर्माण करणाऱ्या प्रतिकारशक्ती पेशींची पातळी वाढलेली दिसली. कमी पातळीवरच्या करोना संसर्गात जेवढा ताप जास्त तेवढे प्रतिपिंड जास्त दिसून आले. करोना १९ विषाणूशी लढताना आपली प्रतिकारशक्ती दुप्पट शक्तीने काम करीत असते असे दिसून आले आहे. प्रतिकारशक्ती प्रणाली व प्रतिपिंड हे दोन्ही झुंज देतात. या संशोधनाचा उपयोग प्रभावी लस तयार करण्यासाठी होऊ शकतो.