पंढरपूर, वृत्तसंस्था । कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोंडिबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई टोणगे यांना मिळाला.
यावेळी अजित पवार म्हणाले की, ’18-20 महिने मंदिर बंद होती. वारीत खंड पडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही मला म्हणायचे हे पुर्वरत व्हायला पाहिजे. मात्र कोरोना कमी होत नव्हता. मात्र, यंदा प्रशासनाला चांगली साथ दिली. सगळ्यांनी एकत्रित ठरवून यात्रा केली. आता मंदिरंही सुरु झाली आहेत. महापूजेमध्येही मी सहभागी झालो. पण, महाराष्ट्रातील जनतेला सांगतोय कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. युरोपात जास्त पेशंट मिळायला लागलेत. लसीचा दूसरा डोस घेतला पाहिजे. लोक पहिला घेतात आणि दूसरा घेण्याची गरज नाही म्हणतात. डब्ल्यूएचओनं सांगितलंय बुस्टर डोसची गरज नाही. मुख्यमंत्री आणि प्रशासन यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतोय’
आज कार्तिक एकादशी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गर्भगृहात झेंडु , शेवंती ,कार्नेशियन ,गुलाब अशा विविध पंधरा प्रकारच्या पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे, या सजावटीसाठी वेगवेगळ्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला असुन हि सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त राम जामभुळकर यानी केली आहे.