अमरावती, प्रतिनिधी । शहरात झालेल्या हिंसक घटनेनंतर रविवारी अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता दिसून आली. या प्रकरणी एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून रविवारी सायंकाळपर्यंत ५० संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, त्रिपुरातील कथित हिंसाचार घटनेच्या अफवेने राज्यात निघालेले मोर्चे आणि त्यानंतर अमरावतीसह इतर शहरांत उफाळलेला हिंसाचार या घटनांची चौकशी केली जाईल व दोषींना कठोर शासन केले जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी प्रसार माध्यमांना दिली.
अमरावतीमध्ये ४ दिवस संचारबंदी लागू केली असून इंटरनेट सुविधाही बंद केली आहे. रविवारी भाजपने अमरावतीच्या ग्रामीण भागात बंद पुकारला होता. त्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला. पण एकूण राज्यातील स्थिती नियंत्रणात आहे.
त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी राज्यात कोणी मोर्चे काढले त्याची माहिती पोलिस घेत आहेत. यातील सहभागी सर्व संघटनांची चौकशी केली जाईल व हिंसाचारात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असे वळसे पाटील म्हणाले.
अमरावतीत तणावपूर्ण शांतता
शहरात रविवारी तणावपूर्ण शांतता होती. चौकाचौकात पोलिसांची कुमक तैनात होती. संचारबंदी असल्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्व प्रमुख मार्ग निर्मनुष्य होते. दरम्यान, रविवारी दुपारी पोलिसांनी शहरातील काही भागातून पथसंचलन केले.
मालेगावात ५ गुन्हे, १८ जणांना अटक
मालेगावातील दगडफेक व हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करून १८ जणांना अटक केली आहे. अटकेतील सर्व जण १९ ते ४५ वयोगटातील आहेत.