मुंबई, वृत्तसंस्था । शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली आहे. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे.
बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेबांचं निधन झालं. “आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील,” असं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय. आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत
मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस झाला . त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करतानाच शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रावरच नव्हे, तर आख्ख्या देशावर असलेला प्रभाव सांगितला होता.