जामनेर- मंगळवारी जामनेर तालुक्यातील नेरी व देवपिंप्री येथील सुमारे २०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावर भाजपचे जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी राष्ट्रवादीवर टीकात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
यावेळी त्यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून प्रतिपादन केले कि, ” तालुक्यातील नेरी व देवपिंप्री येथील ज्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ते कधीही भाजपचे पदाधिकारी वा कार्यकर्ते नसल्याचा दावा करत, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उसने अवसान आणू नये”.
चंद्रकांत बाविस्कर यांनी सदर निवेदनात नमुद केले आहे की , खरं बघायला गेलं तर हा प्रवेश स्थानिक राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे पाठ करून नवीन नाथाभाऊंच्या नेतृत्वाकडे घडलेला आहे. मुळात ज्या कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला ते कधी भाजपवासी नव्हतेच. आता यात विचार करण्यासारखे असे आहे की ज्या ज्या मंडळींनी पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला असे दाखवण्याचे चित्र आहे ही मंडळी कधीच भाजपाची नव्हती असा दावा देखील त्यांनी यात केला आहे.
जामनेर तालुक्यातील देवपिंपरी आणि नेरी येथील २०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यात असं दाखवण्यात आलं की भाजपाला जामनेर तालुक्याला खिंडार पडले. तथापि, ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यात एकही कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा मुळात न होता,न आहे ! राष्ट्रवादीचे उसने अवसान आणण्याचा कार्यक्रम होता. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ते भाजपाचे कार्यकर्ते होते आणि आज राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेला आहे. तर माझा प्रश्न असा आहे की ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यातले किती भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य अथवा भारतीय जनता पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य होते किंवा आहेत ? तसेच भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य सुद्धा या मंडळींपैकी कोणीच नव्हते. ते परंपरागत काँग्रेस विचारावर चालणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांच्या घरातले कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दाखवून मुक्ताईनगरला नेऊन त्यांच्याच राष्ट्रवादी व काँग्रेसचेच कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश दाखवला व मीडियातून सनसनाटी कशी निर्माण होईल याचा खोटा प्रकार हा मुक्ताईनगर मध्ये घडल्याचा आरोप यात केला आहे.
या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात स्वतः ते निवडणुकीच्या प्रचारात नव्हते तरीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर ४० हजाराच्या लीडने निवडून आले आहेत. त्याच वेळी आपली आपल्या मतदारसंघात काय अवस्था आहे त्याचे चिंतन आपण करावे. जामनेर तालुक्याची काळजी घ्यायला गिरीशभाऊ समर्थ आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि विशेष करून नेत्यांनी त्यांचे उसने अवसान आणून हसे करून घेऊ नये असा सल्ला या निवेदनात भाजपचे जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी दिला आहे.