जळगाव, प्रतिनिधी । मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचेकडील दि. 20 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या पत्रानुसार जळगाव जिल्ह्यामध्ये दिनांक 01/01/2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे. जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणा-या या कार्यक्रमाची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे :
1. एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी : दि. 1 नोव्हेंबर, 2021 (सोमवार)
2. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी : दि. 1 नोव्हेंबर (सोमवार) ते दि. 30 नोव्हेबर, 2021 (मंगळवार)
3. विशेष मोहिमांचा कालावधी : 1) दि.13 नोव्हेंबर, (शनिवार) व दि.14 नोव्हेंबर, 2021 (रविवार) आणि दि. 27 नोव्हेंबर, 2021 (शनिवार) व दि. 28 नोव्हेंबर, 2021 (रविवार)
4. दावे व हरकती निकालात काढणे : दि. 20 डिसेंबर, 2021 (सोमवार) पर्यंत.
5. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे : दि. 5 जानेवारी, 2022 (बुधवार)
जिल्ह्यातील रहिवाश्यांनी दि. 1 नोंव्हेबर, 2021 ते दि. 30 नोव्हेंबर, 2021 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे योग्य तो फॉर्म – नमुना नोंदविण्याचे आवाहन श्री. राऊत यांनी यावेळी केले.
1) फॉर्म – नमूना नं. 6 – नव्याने मतदार नोंदणी करणे.
2) फॉर्म – नमूना नं. 7 – मयत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार यांचे मतदार यादीतील नाव वगळणेकामी.
3) फॉर्म – नमूना नं. 8 – मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलाची दुरुस्ती करण्याकरिता.
4) फॉर्म – नमूना नं. 8 अ – मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीकरिता
दि.1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित नव्यांने नाव नोंदणी करण्याचे शिल्लक असल्यास अशा नवतरुण मतदारांना भारत निवडणूक आयोग यांनी पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे अशा मतदारांनी तसेच इतर काही मतदार आहेत ज्यांची नावातील दुरुस्ती/कायमस्वरुपी स्थानात बदल/मयत मतदार असे अर्ज संबंधित तहसिलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांना नियुक्त केलेल्या ठिकाणी सादर करता येतील. मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.