जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बालरोग व चिकित्सा विभागाकडून गेल्या तीन महिन्यात सुमारे ४५ डेंग्यू बाधित बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. यामुळे गोरगरीब, ग्रामीण भागातल्या रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. डेंग्यूसदृश लक्षणे दिसल्यास बालकांना रुग्णालयात तपासणीसाठी आणावे, असे आवाहन विभागाने केले आहे.
गेल्या तीन महिन्यापासून जिल्ह्यात डेंग्यू आजाराने शिरकाव केला असून नागरिक त्रस्त झालेले आहेत. पालकांनी बालकांना डेंग्यूपासून वाचवावे याकरिता काळजी घेणे गरजेचे आहे. डेंग्यूची लक्षणे जाणवू लागल्यावर नागरिकांनी त्यांचा मुलांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे तपासणी केली. पर्यायाने ज्यांना अधिक उपचारांची गरज होती, त्यांना बालरोग विभाग क्रमांक ४ येथे दाखल करण्यात आले. तेथे विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्यासह त्यांच्या टीमने यशस्वी उपचार केले. खाजगी रुग्णालयांची फी न परवडणाऱ्या गोरगरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयात मोठा आधार मिळाला आहे. येथे तीन महिन्यात डेंग्यूने बेजार झालेल्या सुमारे ४५ रुग्णांना बालरोग विभागाने यशस्वी उपचार करून घरी पाठवले आहे.
बालरोग विभागात अद्ययावत सुविधा प्राप्त झाल्या आहेत. तीन महिन्यात ४५ बालकांपैकी १० गंभीर रुग्णांनादेखील वेळीच उपचार मिळाल्यामुळे जीवदान लाभले आहे. डेंग्यू होऊ नये याकरिता घराची स्वच्छता ठेवावी, डास येणार नाही याची काळजी घेत आहार पौष्टिक असावा. लक्षणे दिसल्यास शासकीय रुग्णालयात सकाळी ओपीडीमधील कक्ष क्र. ३०१ येथे तर दुपारी कक्ष ४ येथे बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावे अशी माहिती विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी दिली. रुग्णांवर डॉ. सुरोशे यांच्यासह डॉ. गिरीश राणे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. शिवहर जनकवाडे, डॉ. स्नेहा पल्लोड, डॉ. विश्वा भक्ता, डॉ. नीलांजना गोयल यांनी उपचार केले. त्यांना अधिपरिचारिका संगीता शिंदे, परिचारिका, कक्षसेवक, एसएमएस कर्मचारी आदींनी सहकार्य केले.