जळगाव, प्रतिनिधी । दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेचे संलग्नित 1500 चे वर बचत गट आहेत. बचतगटाच्या माध्यमातून बँकेशी 15,000 चे वर महिला संलग्नीत झालेल्या आहेत. या माध्यमातून बँक फायनान्शियल इन्क्लुजनचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे. बचत गट हे फायनान्शइल इन्क्लुजन साठी महत्वाचे माध्यम आहे. बहुतेक बचत गट हे उद्यमशिल असून बचत गटातील अनेक महिला उद्योजिका आहेत. परंतु त्यांच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होत नसते.
त्यातही कोरोनाच्या काळात महिलांना रोजगार मिळणे कठीण झाले होते, तेव्हाही बँकेने विविध प्रकारे रोजगार मिळवून देण्यास मदतीचा हात पुढे केला. महिला स्वावलंबनाचे तसेच सक्षमीकरणाचे कार्यक्रम बँक विविध माध्यमातून राबवत असते. जेणेकरुन त्यातील महिलांना रोजगारसंधी उपलब्ध होईल तसेच महिलांना व्यवसायाभिमुख होण्यास प्रोत्साहन मिळेल.
त्या अनुषंगाने जळगाव पीपल्स बँक आयोजित व नाबार्ड प्रायोजित महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीचा दिवाळी महोत्सवाचे दि. 21 ते 24 ऑक्टोबर 2021 पर्यंत यशोदया हॉल, रिंग रोड, जळगाव येथे करण्यात आले आहे. सदर मेळाव्याचे उद्घाटन रेमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त मा.निलिमाजी मिश्रा व मा.सौ. जयश्रीताई महाजन, महापौर, जळगाव शहर महानगरपालिका तसेच बँकेचे चेअरमन मा.श्री. अनिकेत पाटील, माजी चेअरमन मा.श्री.भालचंद्र पाटील, बँकेच्या बचतगट प्रमुख सौ.शुभश्री दप्तरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर महोत्सवाचे हे नववे वर्ष आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाबार्डचे सहा.महाव्यवस्थापक श्री.श्रीकांत झांबरे यांनी केले, त्यामध्ये त्यांनी बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी राबविण्यात येणारा दिवाळी महोत्सव देशातील अत्यंत उल्लेखनिय महोत्सवांपैकी एक असल्याचा विश्वास व्यक्त केला.
मा.निलिमा मिश्रा यांनी आपल्या भाषणात महिलांना मौलिक मार्गदर्शन केले. त्या 22 वर्षांपासून समाजातील विविध स्तरातील विविध महिलांसोबत कार्य करीत आहेत. एका स्टॉलपासून सुरु झालेला हा प्रवास भव्य उद्यमशिलतेत साकार झालाय, या प्रवासात येणार्या व्यवहारीक अडचणी व आव्हाने याबद्दल त्यांनी सांगितले. महिला बनवत असलेली उत्पादने व फॅक्टरीत मशिनच्या सहाय्याने बनवली जाणारी उत्पादने यांच्यात किंमतीचा कसा फरक पडतो ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया त्यांनी विषद केली.
मा.महापौर सौ.जयश्री महाजन यांनी आपल्या मनोगतात, शिक्षीका ते महापौर पदापर्यंतचा आपला प्रवास सांगितला. तसेच महिलांनी उत्पादन विक्रीसाठी संभाषण कौशल्य आत्मसात करावे. जिजाऊं पासून ते साधारण महिलेपर्यंत सर्वांमध्ये असलेल्या स्त्रीशक्तीची उदाहरणे देवून त्यांनी महिलांना प्रोत्साहीत केले.
बँकेचे माजी चेअरमन व संचालक श्री.भालचंद्र पाटील व चेअरमन श्री.अनिकेत पाटील यांनी, महिलंाच्या उद्यमशिलतेचे कौतुक केले. तसेच सदर दिवाळी महोत्सव यापुढे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आयोजित व्हावा यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले. बँकेच्या बचत गट प्रमुख सौ.शुभश्री दप्तरी यांच्या देखरेखी खाली दिवाळी महोत्सव यशस्वी होत असल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले.
खान्देशी व इतर खाद्यपदार्थांचा तडका, दिवाळी फराळ, साडी-ड्रेस मटेरीयल, सोलापुरी चादरी, बेडशिटस्-पिलो कव्हर्स, पायपुसणी व गोधडी, गिफ्ट आर्टीकल्स, बॅग्स-पर्सेस, फणसाचे चीप्स, विविध कोकणी पदार्थ, देवाचे वस्त्र, बाळंतविडा, फुड कोर्ट, सर्व प्रकारचे पापड व मसाले अशी अनेक उत्पादने मेळाव्यात विक्रीस उपलब्ध आहेत. माथेरान, पारोळा, भुसावळ, नंदुरबार, भडगाव, रणाइचे, डांभुर्णी अशा विविध ठिकाणाहून महिला बचत गट मेळाव्यात सहभागी झाले आहेत. तरी सर्व जळगावकरांनी मेळाव्यास अवश्य भेट द्यावी असे आवाहन बँकेतर्फे व नाबार्डतर्फे करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी बँकेचे चेअरमन श्री.अनिकेत पाटील, माजी चेअरमन व संचालक श्री.भालचंद्र पाटील, संचालक डॉ.सी.बी. चौधरी, श्री.सुनिल पाटील, सौ.सुरेखा चौधरी, सौ.स्मिता पाटील, महाव्यवस्थापक श्रीमती स्वाती सारडा तसेच बँकेचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.हर्षदा कोल्हटकर यांनी केले.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातील. सदर कार्यक्रमामध्ये सर्वांनी मास्क घालणे, सोशल डिस्टंसींग ठेवणे, हात सॅनिटाइज करणे इ. कोरोना प्रतिबंधक काळजी घेतली जाईल. स्टॉलधारकांना तसेच ग्राहकांना सदर नियम पाळणे बंधनकारक राहील.