जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने बँकेच्या चाळीसगाव शाखेत चाळीसगाव शहरातील नदी किनारी लगतच्या व्यापार्यांचे झालेल्या नुकसानामुळे या व्यापारी वर्गास पुन्हा उभारी मिळावी व आपला व्यवसाय पुन्हा उभारता यावा या भावनेने अल्प व्याजदरात कर्ज वितरण करण्यात आले. छोटे व्यापारी, किराणा दुकानदार व्यावसायिक यांना स्वयंसिद्ध कर्ज योजनेत अर्थ सहाय्य देण्यात आले. तसेच इतर व्यावसायिक, कृषि केंद्र , महिला बचत गट यांना देखील अल्प व्याजदरात कर्ज वितरण करण्यात आले.
चाळीसगाव शाखेत आयोजित कार्यक्रमात बँकेचे संचालक व चाळीसगाव शाखेचे पालक संचालक श्री सुरेश केसवाणी व मान्यवरांच्या हस्ते विविध व्यावसायिक व सभासद यांना एकूण 1 कोटी 11 लाख रकमेचे कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले यावेळी बँकेचे लघु कर्ज विभाग प्रमुख श्री हेमंत चंदनकर तसेच स्थानिक शाखा सल्लागार समिति सदस्य श्री प्रितमदास रावलानी, बाळासाहेब नागरे, हिरालाल शिनकर व मानस चंद्रात्रे उपस्थित होते. कार्यक्रमात श्री विलास ताकाटे यांनी प्रस्तावना केली व शाखाधिकारी संजय जगताप यांनी आभार प्रदर्शन केले व कर्जदारांना कर्जाची परतफेड नियमित ठेवणेबाबत आवाहन केले.