जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या लोणी गावी ग्रामपंचायतीच्या जागेवरील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समोर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव पथकास आडवे आल्याने समोर आलेल्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी त्यांची समजूत काढत त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवत असताना त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला .याप्रकरणी पहूर पोलिस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे . तथापि एक जण फरार झाला असून पोलीस शोध घेत आहेत.
जामनेर तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून तेथे गावातीलच व्यक्तींनी अतिक्रमण केले होते . अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी संबंधितांना तोंडी लेखी सूचना दिल्या होत्या .तसेच जामनेर आणि जळगाव न्यायालयात या प्रकरणी अतिक्रमण धारकांनी दाखल केलेला दावा खरीज करण्यात आला होता .
सदर अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीने पोलीस ठाण्याकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली होती .त्यानुसार आज गुरुवारी सकाळी ११ ते ११ – ३० वाजेच्या दरम्यान अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवीत असताना दत्तू कडू उगले ,भास्कर काशिनाथ वाघ ,ज्ञानेश्वर कडू उगले यांनी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्याशी हुज्जत घालून यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली . या मारहाणीत पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या डोळ्याला दुखापत झाली .तसेच बंदोबस्त कामी असलेले पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड , पोलीस कॉन्स्टेबल किरण शिंपी , दिनेश मारवडकर , महिला पोलीस कर्मचारी दिव्या छाडेकर यांनाही अतिक्रमणधारकांना चापटा – बुक्क्यांनी मारहाण केली .
याप्रकरणी दत्तू कडू उगले , भास्कर काशिनाथ वाघ , ज्ञानेश्वर कडू उगले यांच्यासह महादू कडू उगले,किर्तीराज केशव उगले ,सागर उगले ,यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे . तसेच पवन महादू उगलेहा संशयित फरार झाला आहे .त्याचा पोलीस शोध घेत आहेत .अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून असून उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे . याप्रकरणी पोलीस ठाण्यात पो .हे . कॉ . किरण शिंपी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवी ३५३ / ३८५ / १४३ / १४७ / ३३२ / ३५४ / ४२७ / ५०४ / ५०६ / १२० ( ब ) / १०९ – ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे करीत आहेत. कायद्याच्या रक्षणार्थ असणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पहूर शहर पत्रकार संघटने कडून निषेध व्यक्त करण्यात आला .