जळगाव, प्रतिनिधी । लखिमपुर येथे शेतकऱ्यांवर वाहन चालवून त्यांची हत्या झाल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी राज्याच्या महविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर च्या महाराष्ट्र बंदला महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने पाठिंबा जाहीर केला आहे.
गेल्या वर्षभरापासून शेतकरी विरोधी ३ काळे कायदे रद्द करण्या च्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हत्या करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे लखिमपुर येथील संतापजनक घटनेवरून समोर आले आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष याचा बचाव करण्याचे पुरेपूर प्रयत्न योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तरप्रदेश सरकारने पोलीस बळाचा वापर करून आंदोलन कर्ते शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे.
लखिमपुर हिंसेचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सोमवारी दिनांक ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने पाठिंबा जाहीर केला असून नागरिकांनी महाराष्ट्र बंद मध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे,भारत ससाणे, प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक अध्यक्ष निलेश बोरा यांनी केले आहे.