जळगाव – इंडिया बांगलादेश टेली कॉलाबोरेशन प्रोजेक्ट नुकताच संपला असून दिनांक 5 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाच्या दिवशी सदर कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमात आदर्श सिंधी हायस्कूल भुसावळ येथील शिक्षिका सरिता वासवानी यांनी टेलीकॉलाबोरेशन प्रोजेक्टवर उत्कृष्ट डॉक्युमेंटरी सादर केली.
मागील तीन महिन्यांपासून या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मध्ये जिल्ह्यातील 60 पेक्षा अधिक इंग्रजी विषय शिक्षक कार्यरत होते. बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशातील 200 पेक्षा अधिक शिक्षक यात सहभागी झाले होते. सदर प्रोजेक्ट अंतर्गत शिक्षकांना 90 -90 मिनिटांचे 15 सेशन्स घ्यावे लागले आहेत. शाश्वत विकासाची ध्येये व त्या अनुषंगाने भारत-बांगलादेश या दोन्ही देशांमधील शिक्षण, संस्कृती, आरोग्य व सामाजिक परिस्थिती यासंदर्भात सखोल अभ्यास या टेली कॉलाबोरेशन प्रोजेक्ट मधून करण्यात आला आहे. सदर प्रोजेक्टमध्ये जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
एससीईआरटी, पुणे चे आयटी उपविभागप्रमुख श्री.योगेश सोनवणे हे सदर प्रोजेक्टचे नॅशनल कॉर्डिनेटर म्हणून काम पाहत आहेत तसेच बांगलादेशच्या आयेशा सिद्दिका या बांगलादेशच्या नॅशनल कॉर्डिनेटर म्हणून काम पाहत आहेत. इंग्लिश टीचर्स वेल्फेअर असोसिएशन जळगाव चे अध्यक्ष भरत शिरसाट हे सदर कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. सदर प्रोजेक्टवर आंतरराष्ट्रीय स्तराचे पुस्तक तयार होत असून सदर पुस्तकाचे संपादन कार्य भरत शिरसाठ व इंग्लिश टीचर्स वेल्फेअर असोसिएशन मेंबर्सकडे देण्यात आले आहे. सदर पुस्तक निर्मिती कामी एससीईआरटी, पुणे चे आयटी उपविभागप्रमुख योगेश सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
असोसिएशन मार्फत नुकतीच मा. शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मॅडम यांची भेट घेण्यात आली व या उपक्रमा संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे सचिव गणेश बच्छाव, सहसचिव टी. बी. पांढरे, खजिनदार एम. आर. चौधरी, सदस्य एस.आर. महाजन व नरेंद्र राजपुत उपस्थित होते. सदर उपक्रम शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडम यांना खूप आवडला आणि त्यांनी सहभागी शिक्षकांबद्दल कौतुकास्पद उदगार काढले. इंग्रजी शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाच्या कार्यशाळेत टेली कॉलाबोरेशन प्रोजेक्टमध्ये सहभागी शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. सहभागी शिक्षकांच्या गौरव सोहळ्यासाठी आपण नक्की येणार अशा पद्धतीचे आश्वासन शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडम यांनी दिले. श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम यांनी शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यामुळे असोसिएशन मार्फत त्यांचे स्वागत करण्यात आले.