मुंबई, वृत्तसंस्था । चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्याेतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. केंद्रीय लघु, मध्यम, सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री, खासदार, आमदार यावेळी उपस्थित राहतील.
मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री राणे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मुंबईत शुक्रवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. चिपी विमानतळ उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत आपले नाव तिसऱ्या क्रमांकावर, छोट्या अक्षरात असल्याची नाराजी व्यक्त करून राणे यांनी, यावरून राज्य सरकारची संकुचित वृत्ती दिसते अशी टीका केली.
राजकारण आणि प्रोटोकॉलमध्ये उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापेक्षा मी सिनियर आहे. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास मीच केला. त्यात शिवसेनेचा काही संबंध नाही. आता लोकार्पण होत असलेल्या चिपी विमानतळाचे कामही मीच केले. शिवसेनेने नाही. मुख्यमंत्र्यांसोबत आमचे वैर नाही. त्यांनी जरूर यावे, पण जे मिरवतात त्यांनी मिरवू नये, असेही राणे म्हणाले.
राज्य सरकारला प्राेटोकॉल कळतो. नाव आहे हे महत्त्वाचे. छोटे आहे की मोठे याला महत्त्व नसते. काल-परवापर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अनादर करून त्यांना बोलविण्याची आवश्यकता नाही, असे म्हणणाऱ्यांनी आपले नाव छोटे आहे, अशी तक्रारही करू नये. चिपी विमानसेवेचे स्वागत दिलदारपणे करायला हवे. – खा. अरविंद सावंत, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते
ठाकरे-राणे आज आमने-सामने
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वादाचा एक अंक मागील महिन्यात सर्वच देशाने पाहिला. या प्रकारानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते शनिवारी एका व्यासपीठावर येणार असल्याने ते नेमके काय बोलतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.