जळगाव, प्रतिनिधी । वादळी पाऊस आणि विजेच्या कडकडाटामुळे शनिवारी (२ ऑक्टोबर) पहाटे भडगाव तालुक्यातील तीन वीज उपकेंद्रे बंद पडून वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या जिगरबाज अभियंते व कर्मचाऱ्यांनी अक्षरश: चिखल तुडवत आणि ओढे-नाल्यातील पाण्यातून वाट काढत ३३ केव्ही वाहिनी दुरुस्त केली आणि वीजपुरवठा पूर्ववत झाला.
शनिवारी पहाटे ५ वाजेपासून पाचोरा – भडगाव परिसरात प्रचंड वादळी पाऊस व विजेच्या कडकडाट होता. त्यातच पाचोरा ते भडगाव या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवर वीज पडल्यामुळे बिघाड झाला. त्यामुळे भडगाव, लोण पिराचे व वडजी ही तीन उपकेंद्रे बंद पडली आणि भडगाव तालुक्यातील जवळपास १० ते १२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. पाचोरा ते भडगाव या विद्युत वाहिनीचे अंतर १४ किमी आहे. बंद पडलेल्या ३३ केव्ही वाहिनीवर झालेला नेमका बिघाड शोधून तो दुरुस्त करणे जिकिरीचे होते आणि त्यासाठी वेळी लागणार होता. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पर्यायी मार्गाने दुपारी अडीच वाजेपर्यंत ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. मात्र पर्यायी व्यवस्था ही तात्पुरती असल्याने बंद पडलेली वाहिनी सुरू करणे आवश्यक होते. मात्र रानावनातून जाणाऱ्या वाहिनीवरील बिघाड शोधणे सोपे नव्हते. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी आणि चिखल झालेला. मात्र प्रतिकूल परिस्थितीचे आव्हान स्वीकारून आजच ही वाहिनी सुरू करायची असा चंग बांधून महावितरणचे कर्मचारी कामाला लागले. अक्षरश: चिखल तुडवत आणि ओढे-नाल्यांतील पाण्यातून वाट काढत त्यांनी बिघाड शोधण्यास सुरुवात केली. वाहिनीवरील प्रत्येक खांबावर चढून त्याचे इन्सुलेटर तपासले. तेव्हा
वेगवेगळ्या खांबांवर जवळपास १६ इन्सुलेटर फुटल्याचे व पंक्चर झाल्याचे आढळून आले. ते सर्व इन्सुलेटर बदलण्यात आले. काम सुरू असताना अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरीही महावितरण कर्मचाऱ्यांना अडवू शकल्या नाहीत. सकाळपासून तहानभूक विसरून काम करत महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी ६.५० वाजता पाचोरा-भडगाव ३३ केव्ही वाहिनीवरील वीजपुरवठा पूर्ववत केला.
भडगाव उपविभागाचे प्रभारी उपकार्यकरी अभियंता रवींद्र राऊळ, भडगाव ग्रामीण कक्षाचे कनिष्ठ अभियंता विवेक जोशी, कोळगाव कक्षाचे सहायक अभियंता विजय पवार, पारोळा कक्षाचे कनिष्ठ अभियंता अनुज धर्माधिकारी, जनमित्र आनंदराव पाटील, वसीम अली, संदीप सोनवणे, भूषण पाटील, योगेश पवार, कपले, बाह्यस्रोत कर्मचारी सुनील भदाणे, मोहसीन अली, योगेश परदेशी, सय्यद अली, नरेंद्र राजपूत यांनी ही कामगिरी फत्ते केली.
या कामगिरीबद्दल या सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांचे जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंता फारूक शेख, प्रभारी कार्यकारी अभियंता राम चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.