मुंबई, प्रतिनिधी । धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना वाढली पाहिजे असे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वप्न आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
धुळे-नंदुरबार जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील दादर येथील सेना भवनात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, धुळे जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित, हेमंत साळुंखे, नंदुरबार जिल्हा प्रमुख आमशा दादा पाडवी, सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, महेश मिस्तरी शिवसेना उपनेते तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मीर्लेकर,उपनेते लक्ष्मण वडले, महानगर प्रमुख सतीश महाले, मनोज मोरे, किरण जोंधळे आदी उपस्थित होते.
पक्ष संघटन वाढवा
धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पक्षसंघटन आणखीन वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करत जोमाने काम करणे गरजेचे आहे. त्यात ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत पक्षाची ताकद वाढवून शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असल्याचे राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी सांगितले.