जळगाव – शासनामार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विविध पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. यालाच अनुसरुन जनसामान्यांत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजावी यासाठी शहरातील तेरा वर्षीय श्रेयस शुक्ल या विद्यार्थ्याची गेल्या सात वर्षांपासून धडपड सुरु आहे. गेल्या सहा वर्षांपासून श्रेयस स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून मूर्ती बनवून नातेवाईक आणि मित्रांपर्यंत पोहचवत आहे.
यासाठी तो आपल्या परिसरातील व शाळेतील मित्रांनाही शाडूमातीपासून मूर्ती घडविण्याचे धडे देत असून, घराघरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या शासनाच्या उपक्रमास हातभार लावत आहे. शहराील मकरंद नगर, नागेश्वर कॉलनीतील राहिवासी असलेले रंगकर्मी दाम्पत्य योगेश शुक्ल व प्रा.श्रध्दा शुक्ल यांचा श्रेयस हा चिरंजीव. तो सध्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड या विद्यालयात इयत्ता नववीत शिकत आहे.
शाळेत झालेल्या स्पर्धेत शाडू मातीच्या मूर्तीचे पर्यावरणाच्यादृष्टीने असलेले महत्व त्याला समजल्याने, दुसरीत असतांनाच त्याने पहिल्यांदा शाडू मातीची मूर्ती बनविली व घरीच गणेशोत्सव साजरा केला. तेव्हापासून आजतागायत त्याच्या घरी त्यानेच बनविलेल्या शाडू मातीच्या गणपतीची स्थापना होते. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आज शहरातील अनेक मुलं मुली आपली कल्पकता वापरीत घरीच गणेशमूर्ती घडवत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्व शहरातील नागरिकांना पटवून देण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत.