जळगाव, प्रतिनिधी । पारनेर जि. अहमदनगर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव येथे संजय गांधी निराधार योजना कार्यालयात बदली झाली असून याबाबत शासनाचे उपसचिव डॉ.माधव वीर यांनी सोमवारी आदेश काढले आहेत.
देवरे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तीन महिला अधिकार्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार तहसीलदार देवरे यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आलेले नाही. त्याबाबत विभागीय आयुक्तांनी शासनाला कळवले होते.
देवरे यांनी अरुण आंधळे व निवृत्ती कासुरे यांच्याविरुद्ध महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेही तक्रारी केल्या होत्या. अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार देवरे यांनी गंभीर स्वरूपाच्या अनियमितता केलेल्या आहेत. त्यांनी अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन पदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याबाबत अहवाल सादर केलेला आहे. समाज माध्यमांवर, प्रसार माध्यमांमध्ये भाष्य केल्याने शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांनी कार्यरत पदावर शासकीय कामकाजात कर्तव्यपरायणता ठेवलेली नसून, शासकीय कर्तव्य व जबाबदार्या पार पाडलेल्या नाहीत. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी शासनास केलेल्या शिफारशीनुसार देवरे यांची बदली करण्यात आली असल्याचे आदेशात नमूद आहे. आमदार निलेश लंके यांच्याबाबत केलेल्या विधानामुळेही देवरे या चर्चेत आल्या होत्या.